Maharashtra-

मुंबई : राज्यात कोरोनाचा आकडा वाढत असला तरी आपण यासाठी तयारी केली आहे. काही लोक यातही राजकारण करत आहेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही. घाणेरडे राजकारण करत आहेत ते त्यांना करु द्या. मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात वाढता कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावर सरकारकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. सत्ता येते जाते, पण जीव गेला तर परत येत नाही, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे आपण कोरोनाचा गुणाकार कमी करण्यात यशस्वी झालो आहोत. कोरोनाची वाढ आपण काही प्रमाणात नियंत्रणात ठेवली आहे. मात्र, या लढाईत दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांनी मी आंदराजली वाहतो. आपल्यासाठी लढताना दोन पोलीस शहीद झाले आहेत. त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करू, पण माणूस गेला आहे. डॉक्टरांसह पहिल्या फळीतील कर्मचारी आणि अधिकारी जीव धोक्यात घालून तणावाखाली काम करत आहेत, त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.