Maharashtra verdha-

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करुन आनंदवन उभे केले आणि त्यांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे यांनी हा समाजसेवेचा वसा लोकबिरादरीच्या माध्यमातून पुढे चालू ठेवला. आणि आता त्यांचे चिरंजीव अनिकेत आणि डॉ.दिगंत यांनीही स्वतःला समाजसेवेत झोकून दिले आहे. अतिदुर्गम नेलगुंडा परिसरातील मुलांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देऊन अती मागास माडीया जमाती मध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली आहे. आरोग्य सुविधा, पाणी पुरवठा आणि निर्मल ग्राम माध्यमातून जनतेचे देवदूत बनले आहेत.
डॉ प्रकाश बाबा आमटे यांनी ५० वर्षापूर्वी भामरागड तालुक्यात हेमलकसा येथे लोकबिरादरी आश्रमाची स्थापना केली. अती दुर्गम, घनदाट जंगल आणि सर्व सुविधांपासून वंचित असलेल्या या भूमीचे त्यांच्या वास्तव्यामुळे नंदनवन झाले. त्यांच्या जीवनप्रवासात मोलाची साथ डॉ. मंदाताई आमटे यांनी दिल्यामुळे हे शक्य झाले. डॉ. प्रकाश आमटे यांनी तालुक्यातील मुलांसाठी हेमलकसा येथे शाळा सुरू केली . आज येथे ६०० मुलांची रहिवासी शाळा असून येथून अनेक मुले- मुली वकील, इंजिनिअर, डॉक्टर, शिक्षक आणि शासकीय सेवेत मोठ्या पदावर काम करत आहेत. या भागातील जनतेचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकास केल्यामुळे हा परिसर समृध्द झाला आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांची मुले अनिकेत आणि डॉ. दिगंत यांनी सुध्दा येथील आदिवासी मुलांबरोबर शिक्षण घेतले आहे. उच्च शिक्षण मोठ्या शहरात घेऊन पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी येऊन त्यांनी समाजसेवा सुरू केली आहे. मागील दहा वर्षापासून या दोघांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगले उपक्रम राबविले आहेत.
येथून ३० किमी वर असलेल्या नेलगुंडा या अती दुर्गम भागात अनेक वर्षापासून शैक्षणिक आणि आरोग्याच्या समस्या होत्या. पावसाळ्यात नेलगुंडा आणि आजूबाजूच्या १५ गावांचा तर जगापासून संपर्क तुटतो इतका भयंकर पाऊस पडतो. त्यात मलेरिया, सर्दी ताप, महिलांच्या आरोग्य समस्या आ वासून उभ्या राहत होत्या. या समस्या दूर करण्यासाठी २०१५ मध्ये अनिकेत आणि दिगंत यांनी दिवस रात्र मेहनत घेतली. अनिकेत यांनी येथे नर्सरी ते पाचवी पर्यंतची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली. आजूबाजूच्या सहा किलो मीटर परिसरातील मुले येथे शिक्षण घ्यायला येतात. पावसाळा वगळता इतर आठ महिने ही शाळा चालविली जाते. शाळेचा चांगला परिसर आणि अभ्यासाची गोडी निर्माण करणाऱ्या शिक्षकांमुळे विद्यार्थी संख्या वाढली . त्यामुळे मुलांचे आरोग्य आणि शैक्षणिक विकास झाला. आजूबाजूच्या गावांमध्ये लोकवर्गणी आणि दानशुरांच्या साह्याने २१ तलाव बांधले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पिण्याची पाण्याची समस्या दूर झाली आहे. जलसिंचनामुळे एक पीक शेतीला आधार मिळाला आहे. जीवनावश्यक भाजीपाला या पाण्यावर घेता येऊ लागला आहे. तीन पाण्याच्या टाक्या आणि विहिरी खोदल्या असून नळयोजनेच्या साह्याने लोकांच्या घरात पाणी पुरवठा केला आहे. यासाठी विविध देणगीदार मदतीसाठी पुढे आले आहेत. लोकांचा सहभाग म्हणून त्यांच्याकडून १० टक्के आर्थिक मदत सुध्दा घेतली आहे. निर्मलग्राम परिसर झाला असला तरी पाण्याच्या असुविधेमुळे शौचालय वापरले जात नव्हते आता त्यांचा वापर होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांचे उघड्यावर शौचाला जाणे बंद झाले आहे. त्यामुळे आरोग्य सुधारले आहे.
नेलगुंडा परिसरातील अनेक गावांमध्ये आरोग्याच्या अनेक समस्या होत्या मागील पाच वर्षात या ठिकाणी ७ आरोग्य केंद्र सुरू केली आहेत. डॉ. दिगंत आणि डॉ. अनघा या येथे आठवड्यातून दोन वेळा भेटी देऊन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. या भागातील दहावी शिक्षण घेतलेल्या मुलामुलींना आरोग्याचे मुलभूत शिक्षण देऊन त्यांना आरोग्य सेवक बनविले आहे. गरोदर मातांची मुलभूत तपासणी करणे, ताप, सर्दी खोकला, सर्पदंश, मलेरिया सारख्या आजारांवर मुलभूत उपचार देण्याचे काम हे आरोग्य सेवक करत आहेत. आरोग्याच्या सुविधा आणि शैक्षणिक सुविधा मोफत दिल्या जात असल्याने माडीया गोंड समाजातील लोकांच्या राहणीमानात बदल झाला आहे.
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर हेमलकसा भागातील आदिवासींसाठी अनघा आणि समीक्षा आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली माडीया, तेलगू, हलबी भाषेत ऑडियो क्लिप तयार करून ५० पेक्षा जास्त गावांमध्ये जन जागृती कार्यक्रम राबविला आहे. सोशल डीस्टसींग, मास्क वापर आणि स्वच्छतेच्या सर्व बाबींची काळजी घेतली जात आहे.
राज्यातील प्रत्येक गावामधील समस्या सोडविण्यासाठी स्थानिक युवकांनी पुढाकार घ्यावा आणि गावाकडे चला ही संकल्पना रुजवावीअसा मोलाचा संदेश अनिकेत आमटे यांनी ‘सोशल मिरर’ द्वारे दिला आहे