- Maharashtra
•मिरची तोड मजुरांच्या मदतीसाठी तेलंगणा सिमेवर धावले पालकमंत्री विजय वडेट्टीवार..
•तीन दिवसात २०हजार मजूर स्वगावी रवाना
चंद्रपूर : तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात अडकून असलेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मिरची तोडणारे कामगार मिळेल त्या वाहनाने तेलंगणाच्या सिमेवर येत होते. या मजूरांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरती जाण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपूरहू थेट लकडकोट व पोडशा या ठिकाणी स्वत: धाव घेवून मदतीचा हात दिला. हजारो मिरची तोड मजूरांची विचारपूस करून त्यांना पिण्याच्या पाण्याची, जेवनाची व्यवस्था केली. मिळेल त्या वाहनांने त्यांच्या स्वगावी पोहोचविण्याची व्यवस्था केली. गेल्या तीन दिवसात जवळपास १५ हजार मजूर त्यांच्या स्वगृही पोहोचले. या मदतीमुळे हजारो मजूरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले. यावेळेस त्यांच्या सोबत खासदार बाळू धानोरकर, राजूराचे आमदार सुभाष धोटे हे होते.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास २५ ते ३० हजार मजूर मिरची तोडण्याच्या मजूरीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तेलंगणा व आंध्रप्रदेशात गेले होते. कोविड-१९ या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी २४ मार्चला देशात संचारबंदी लागू करण्यात आली. परिणामी तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मिरचीतोड कामगार गेल्या चार महिन्यांपासून अडकले आहेत. हे सर्व मजूर अल्पभूधारक शेतकरी, शेतमजूर आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला सुरूवात झाली असून त्यांच्या शेतातील कामे खोळंबली जाणार आहे. या मजुरांचे वृद्ध आईवडील, मुले हे त्यांच्या स्वगावी असल्याने दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीमूळे मजुरांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या स्वगावी आणण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारकडे लेखी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. केंद्र व राज्य शासनाने परराज्यात अडकलेल्या मजुरांना स्वगृही जाण्याची परवानगी देण्याबाबत घोषणा केली. त्यामुळे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात अडकून असलेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजूर मिळेल त्या वाहनाने दोन्ही राज्याची सिमा असलेल्या लकडकोट व पोडशा या ठिकाणी येऊ लागले.
मात्र अचानक आलेला मजुरांचा लोंढा कसा रोखायचा यांना घरी कसे पाठवावे याचा प्रशासन विचार करीत होते. काही मजूर पायीच आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. यातील काही मजूरांनी विजय वडेट्टीवार यांना मोबाईल करून आपली आपबिती सांगितली. अशावेळी विजय वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चातून वाहनाची व्यवस्था लकडकोट व पोडशा या गावी केली. त्यांनी स्वत: नागपूर वरून लकडकोट व पोडशा येथे जाऊन मजूरांची आस्तेने विचारपूस केली. गेल्या तीन दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, ब्रम्हपूरी, सावली, नागभीड, चिमूर, मूल यासह अनेक तालुक्यातील तसेच गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा, आरमोरी, वडसा यासह अनेक तालुक्यातील जवळपास २० हजार मजूरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले. यावेळेस काही मजूरांनी वाहनधारक पैसे मागत असल्याची तक्रार मंत्री महोदयांकडे करताच त्यांनी कोणत्याही मजूरांनी पैसे देता कामा नये, ही सर्व सेवा विनामुल्य आहे, असे स्पष्टपणे सांगितले. लकडकोट व पोडशा येथे हजारो मजूरांचे आगमन होत असल्याचे बघून दोन्ही जिल्ह्यातील मिळेल ती वाहने या मजूरांसाठी उपलब्ध करून देत होते. यासाठी स्वखर्चातून या वाहनामध्ये डिझेल भरण्याचे काम पालकमंत्री महोदयांचे कर्मचारी करीत होते. या सर्व प्रकारामुळे मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.